दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षी राज्यस्तरीय, पुणे विभागीय व सातारा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण केले जाते. यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शनिवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. पत्रकार, वाचक मित्रांसह नागरिकांनी या समारंभास उपस्थित रहावे, अशी विनंती फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष सोनवलकर यांनी केली आहे.
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे दिल्या जाणार्या आदर्श पत्रकार आणि सामाजिक पुरस्कारांची घोषणा करताना सुभाष सोनवलकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्कप्रमुख श्रीरंग पवार, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे आणि फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
वृत्तपत्र क्षेत्रामध्ये उत्कृष्ट, प्रभावी व विधायक कार्य करणार्या पत्रकारांना फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने गेल्या २० वर्षांपासून सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार ‘एबीपी माझा’चे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वर्गीय श्रीमती इंदुमती कासार (मोहोळकर) स्मृतीप्रित्यर्थ पुणे विभागस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार संपादक, ‘सांगोला नगरी’ सतिश सावंत यांना जाहीर झाला असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
माजी नगरसेवक, उद्योजक कै. सुभाषराव निंबाळकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार ढेबेवाडी येथील दै. सकाळ प्रतिनिधी सावंत यांना जाहीर झाला असून रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.