दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२२ । मुंबई । राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ आणि नागरी बाल विकास केंद्र पथदर्शी कार्यक्रमाचा आढावा आणि विस्तार योजनेचा शुभारंभ दि. 15 मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, भारत सरकारच्या युआयडीएआयचे उपसंचालक सुमनेश जोशी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, युनिसेफच्या पोषण विशेषज्ञ राजलक्ष्मी नायर उपस्थित रहाणार आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे मंगळवार दि. 15 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी शुभारंभ केला जाणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षात प्रत्येक बाल विकास प्रकल्प कार्यालयास 3 याप्रमाणे 1659 आधार नोंदणी संच राज्यातील सर्व 553 बाल विकास प्रकल्प कार्यालयांना पुरवठा करुन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. महाआयटी हे आधार नोंदणी एजन्सी म्हणून काम करणार आहे. या आधार नोंदणी एजन्सीद्वारे 100% बालकांची आधार नोंदणी पूर्णत्वास येणार आहे.
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार मुंबईत एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती. मुंबईतील एम पूर्व व एम पश्चिम या प्रभागामध्ये अति कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे समजल्यानंतर चेंबूर, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे व मुलुंड पूर्व या 6 प्रकल्पांमधील या मुलांवर उपचार करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी), तसेच मुलांचे वजन, उंची, दंड घेर याची बालरोग तज्ञांकडून तपासणी करून, अति तीव्र कुपोषित मुलांची नोंद करून या मुलांच्या पालकांना आहार तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. मुंबईतील नागरी बाल विकास केंद्र पथदर्शी कार्यक्रमाचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी या केंद्राचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून कुपोषण मुक्तीच्या दृष्टीने यापुढील काळात विविध योजना राबविण्यात येतील.