‘स्थैर्य’चे वृत्त तंतोतंत खरे; आज दुपारी ४ वाजता वाजणार निवडणुकीचा बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद


‘स्थैर्य’ने वर्तवलेले भाकीत खरे ठरले! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी ४ वाजता घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम होणार जाहीर; आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. १३ जानेवारी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल आजच वाजणार, हे ‘स्थैर्य’ने वर्तवलेले भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून, राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) अधिकृतपणे हालचाली सुरू केल्या आहेत. आज (मंगळवारी) दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार असून, यामध्ये निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी आज सकाळीच प्रसारमाध्यमांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार, राज्याचे निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता मुंबईतील मलबार हिल येथील ‘सह्याद्री अतिथीगृह’ येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय ‘जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका’ हाच असून, यात निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

काही वेळापूर्वीच ‘स्थैर्य’ने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत आज निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली होती. निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे आता त्या बातमीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. आयोगाने राज्यातील सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना/प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

दुपारी ४ वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात तत्काळ आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू होईल. त्यामुळे फलटणसह सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आज संध्याकाळपासूनच ढवळून निघणार आहे. आता कोणता पक्ष बाजी मारणार आणि ग्रामीण भागातील सत्तेची चावी कोणाकडे जाणार, याचा थरार लवकरच सुरू होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!