राज्य पुरस्कार प्राप्त धन्यकुमार तारळकर गुरुजींमुळे फलटणच्या नावलौकिकात भर – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दिला जातो. यावर्षी सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातील मदने-नायकुडेवस्ती येथील प्रभारी मुख्याध्यापक श्री. धन्यकुमार तारळकर सर यांना सन २०२३ चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

श्री. धन्यकुमार तारळकर यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल फलटण या ठिकाणी त्यांचा भव्य सत्कार सोहळा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फलटण – कोरेगाव मतदार संघाचे आमदार श्री. दिपकराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले उपस्थित होते. शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. राजेंद्र बोराटे, व्हाईस चेअरमन श्री. विजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फलटण तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक शिक्षक व मित्रपरिवार या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

आपल्या मनोगतात श्रीमंत संजीवराजे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. फलटण तालुक्यात आजपर्यंत चार राज्य पुरस्कार मिळाले. यामध्ये श्री. धन्यकुमार तारळकर सर यांचा समावेश आहे. श्री. तारळकर यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने फलटणच्या नावलौकिकात भर पडली आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत संजीवराजे यांनी काढले.

श्री. दिपकराव चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिक्षक पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला जातो व त्यांना पुढील काम करण्याची प्रेरणा मिळत असते. तसेच फलटण तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ही अतिशय चांगली आहे आणि हे सर्व कार्य शिक्षक प्रामाणिकपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. राजेंद्र बोराटे यांनी आपल्या मनोगतात सध्याच्या शैक्षणिक कार्यप्रणालीवर आपले मत व्यक्त केले व जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी सरकारने सुधारित योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरेंद्रकुमार घाडगे यांनीही श्री. धन्यकुमार तारळकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. धन्यकुमार तारळकर व सौ. तेजश्री तारळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. श्री. धन्यकुमार तारळकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केल्यानेच हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. यासाठी त्यांच्या कुटुंबाचे बहुमोल असे सहकार्य त्यांना मिळाले. त्यांचे बंधू फलटण नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती किशोर तारळकर सर यांचेही मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश तांबे यांनी केले व सूत्रसंचालन अनिरुद्ध मुळीक यांनी केले व आभार श्री. कुणाल काटे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!