शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे रोपे आणि फळझाडांची कलमे देणार : कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | बारामती | कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करुन राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांची कलमे देण्याचे कार्य करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कन्हेरी येथील तालुका फळरोपवाटिकेला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुनील शेळके, अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वत रणजित पवार, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, दि बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विधानसभा मतदारसंघात राज्यासाठी मार्गदर्शक अशी विविध विकास कामे होत आहेत. कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्यामार्फत कन्हेरी येथील फळरोपवाटिका अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करुन उभारण्यात आली असून अशाप्रकारची राज्यातील एकमेव रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेमध्ये तयार होणाऱ्या रोपामुळे कृषी विभागाला फायदा होत आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या रोपवाटिकेमध्ये तयार रोपाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रक्कमेसाठी या रोपवाटिकेचे स्वतंत्र खाते तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले.

श्री. नायकवडी आणि श्री. नलावडे यांनी फळरोपवाटिकेविषयी माहिती दिली.

मंत्री श्री.मुंडे आणि श्री. पाटील यांनी बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट दिली. येथील उत्पादन आणि कृषी विज्ञान केंद्र येथील मधुमक्षिका पालन, रोपवाटिका, कृषक ॲप, पाणी वापर बचतीसाठी तयार करण्यात आलेले यंत्र, भीमा किरण आणि भीमा शक्ती कांदा, माती परीक्षण आदीबाबत माहिती घेतली. राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!