स्थैर्य, फलटण, दि. २७ : महाराष्ट्र सरकार करोना पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता, शेतकरी आदी सर्व समाज घटकांना आधार देण्यात सर्वच पातळीवर निष्फळ ठरले असून अशा सरकारने स्वतःहुन राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक -निंबाळकर यांनी केली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नेते खा. रणजितसिंह नाईक -निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक -निंबाळकर यांच्या राजभवन या निवासस्थानासमोर भाजपच्यावतीने माझे आंगण, माझे रणांगण असा नारा देत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटण नगरपरिषद गटनेते अशोकराव जाधव, भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष उदय मांढरेे, नगरसेवक सचिन आहिवळे, अभिजित नाईक निंबाळकर, मनोज कांबळे यांच्यासह भाजप शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे न भुतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील जनता आज उपाशी आहे. देशातील एकूण करोना संख्येच्या 35 टक्के संख्या महाराष्ट्र राज्यात असून त्यांना योग्य आधार देण्यात महाराष्ट्र सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असल्याने मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो, असे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या संकटकाळी समस्त मानवजात, जग व भारत देश प्रभावीपणे लढत असताना आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे. सरकार सर्व आघाडीवर निष्प्रभ ठरले असून केंद्र सरकारने असले निष्प्रभ सरकार बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आता तरी हे सरकार जागे होईल व संकटाचा सामना करण्यासाठी योग्य योजना बनवून पॅकेज देण्याच्या दिशेने पावले उचलेल, असा विश्वास यानिमित्ताने भाजप पदाधिकार्यांनी व्यक्त करुन ठाकरे सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
खा. रणजितसिंह, अॅड. सौ. जिजामाला यांच्यासह भाजप शहर व तालुका पदाधिकार्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन माझे आंगण, माझे रणांगण आंदोलन करण्यात आले.