म्हसवड येथे दुय्यम सब रजिस्टर कार्यालय सुरु होणे ही काळाची गरज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड दि. ९. : माण तालुक्यात सर्वाधिक जमिन खरेदी – विक्रीचे व्यवहार म्हसवड शहरात होत असुन म्हसवड सह परिसरातील जवळपास ७९ गावांतील सर्व व्यवहार हेच याच शहरावर अवलंबुन असल्याने याठिकाणी दुयय्म निबंधक कार्यालय स्वतंत्रपणे सुरु होणे ही काळाची गरज बनली आहे.

याठिकाणी यापुर्वी कार्यरत असणारे दुय्यम सब रजिस्टर चे भेट कार्यालय ऑनलाईन च्या नावाखाली अधिकार्यांनी बंद केले आहे, त्यामुळे म्हसवड सह पंचक्रोशीतील हजारो नागरीकांना किरकोळ कामासाठी दहिवडी येथे जावे लागत असुन यामुळे नागरीकांचा वेळ व पैसा वायफळ जात आहे, याठिकाणी आजवर होणारे व्यवहार विचारात घेवुन येथे तात्काळ भेट रजिस्टर कार्यालय अथवा म्हसवड साठी स्वतंत्र रजिस्टर कार्यालय सुरु करावे अशीही  मागणी सध्या जोर धरत आहे.

माण तालुक्यात सर्वात मोठे शहर व नगरपरिषद, कोर्ट, महाविद्यालय, मार्केट कमिटी अशा सर्व सुविधा उपलब्ध असणारे शहर म्हणुन म्हसवड शहराची ओळख आहे, यामुळेच याठिकाणी ब्रिटिश काळापासुन दस्ताऐवज चे प्रमाण अधिक असल्याने येथे यापुर्वी दुय्यम रजिस्टर चे भेट कार्यालय कार्यरत होते मात्र गत काही महिन्यांपासुन सदरचे हे कार्यालय ऑनलाइन च्या नावाखाली अचानक बंद करण्यात आल्याने नागरीकांची ससेहोलपट सुरु झाली आहे. सध्या सदरचे कार्यालय हे दहिवडी येथे सुरु असुन याठिकाणी अनेकदा नेट प्रॉब्लेम मुळे व्यवहार अपुर्ण रहात आहेत त्यामुळे नागरीकांचे एकाच हेलपाट्यात काम होईलच याची शाश्वती नाही याचा फटका अनेकदा नागरीकांना बसत आहे. वास्तवीक या कार्यालयात होणारे बहुतांशी व्यवहार हे म्हसवड व परिसरातीलच सर्वाधिक असल्यानेच म्हसवड शहरात सदर कार्यालयाचे भेट कार्यालय ब्रिटिश काळात सुरु करण्यात आले आहे. मात्र ऑनलाइन च्या नावाखाली सध्या म्हसवड येथील कार्यालय बंद करण्यात आले असुन याचा मोठा परिणाम येथील संबंधित छोट्या व्यावसाईकांवर तर झालाच आहे, याशिवाय सदरच्या कार्यालयात जमा होणार्या महसुलावरही झालेला दिसुन येतो. सदरचे कार्यालय हे अतिशय महत्वाचे कार्यालय असल्याने याठिकाणी होणारे व्यवहार व यातुन शासनाला मिळणारे उत्पन्न, नागरीकांची वाढती मागणी याचा सारासार विचार करुन म्हसवड येथे सदरचे दुय्यम कार्यालय स्वतंत्रपणे सुरु करुन शासनाने नागरीकांचे कार्यालयाविना होणारे नागरीकांचे हाल थांबवावेत अशी जोरदार मागणी होत आहे.

सध्या कोरोनामुळे एस.टी. च्या फेर्या सुरु नाहीत, जरी सुरु झाल्या तरी त्याला प्रवाशांचा प्रतिसाद नाही अशावेळी ग्रामीण भागातुन व्यवहारासाठी येणार्या जनतेकडे दहिवडीला जाण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत असुन एका हेलपाट्यात काम होईलच याची खात्री नाही त्यामुळे अर्थिक डबल नुकसान सामान्य जनतेचे होत आहे.

दहिवडी ते शेनवडी ६० कि.मी. अंतर

कोणत्याही प्रकारचा दस्त करावयाचा झाला तर तो दहिवडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात केला जात आहे. अशावेळी जर शेनवडी येथील एखादा व्यवहार असेल तर त्याला दस्तासाठी दहिवडीलाच जावे लागते, शेनवडी ते दहिवडी हे अंतर सुमारे ६० कि.मी. असल्याने त्यासाठी आवश्यक असणारे सर्व लोक दहिवडी पर्यंत ने – आण करण्याचा नाहक खर्च संबधीतांना करावा लागत आहे.

स्टँपचा निर्माण होतोय तुटवडा

सध्या म्हसवड येथील कार्यालय बंद झाल्याने येथील सर्व मुद्रांक विक्रेते सकाळी ११ नंतर दहिवडी येथे जात आहेत, त्यामुळे जर म्हसवड सह परिसरातील ७९ गावांतील कोणालाही साधा एखादा स्टॉप जरी लागला तरी त्याला दहिवडीलाच जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

म्हसवड येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु झाल्यास म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास ४२ गावांची  व ३८ वाड्यांची सोय होणार आहे.

दहिवडी कार्यालयातील गर्दी व प्रशासनाचा ताण कमी  होईल  –

सध्या माण तालुक्यात एकमेव दुय्यम निबंधक कार्यालय सुरु आहे, तर तालुक्यात १०६ महसुली गावे आहेत त्या सर्व गावातील खरेदी – विक्रीचे व्यवहार हे दहिवडी येथील कार्यालयातुन होत असल्याने त्याठिकाणी कायम गर्दी होत आहे, त्यामुळे सदर कार्यालयातील कर्मचारी व अधिकार्यांवर कामाचा ताण येताना दिसत आहे. म्हसवड येथे सदर कार्यालयाची एक शाखा सुरु झाल्यास नागरीकांच्या सोई बरोबरच प्रशासनाचा ताणही दुर होणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!