सातार्‍यातील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करा – धनंजय कदम


स्थैर्य, 19 जानेवारी, सातारा : सातारा शहरातील बाँबे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक व गोडोली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली अथवा कार्यान्वित न केलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय कदम यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच वाहतूक पोलिस शाखेस निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही धनंजय कदम यांनी दिला आहे.

कदम यांनी दिलेल्या निवेदनात, सन 2017 पासून या विषयाचा मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. पालिका प्रशासन व पोलिस यंत्रणा एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहे. बाँबे रेस्टॉरंट चौकात सायंकाळनंतर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. वाहतूक पोलिस अनेकदा कागदपत्र तपासणीत गुंतलेले असतात. अलीकडील वाहतूक व्यवस्थेतील बदलांमुळे कोरेगावकडून येणार्‍या वाहनांना वळण घेताना अडचणी येत असून, दुचाकी अपघातांचे प्रमाणवाढले आहे. तसेच जिल्हा परिषद व गोडोली परिसरात मोठी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये व शासकीय विश्रामगृह असल्याने दिवसरात्र वाहन व पादचार्‍यांची वर्दळ असते. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहने भरधाव जात असून, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे धोकादायक बनले आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नगरपालिकेकडून 2022 मध्ये रस्ते रुंदीकरणानंतर सिग्नल सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार वर्षे उलटूनही रस्ते रुंदीकरण व सिग्नल यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही, याकडेही कदम यांनी लक्ष वेधत बाँबे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक, गोडोली चौक व जुने आरटीओ चौक येथे नवीन व अद्ययावत सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करून वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!