शाळू पेरणीस प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, कराड, दि. 10 :  कराड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन व भुईमूग पिकांची काढणी करून हस्त नक्षत्राच्या दरम्यान खरिपातील शाळू पिकाची  पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग शिवारात सुरू झाली आहे.

सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतातील ओलवर पेरणी करू लागले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग पिकाची काढणी करून अनेक शेतकर्‍यांनी कराड तालुक्यात पूर्वेकडील विभागात पेरणी सुरू केली आहे. जिरायती विभागातील शेतकरी पेरणीसाठी गडबड करतात. हस्त नक्षत्राच्या दरम्यान केलेल्या पेरणीला पिकाला चांगला उतारा पडतो तर अनेक शेतकर्‍यांच्या विहिरींची पाणी मार्च महिन्यात पातळी कमी होते.  त्यामुळे शाळू पिकाला पाणी देण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठीच शाळू पीक पेरणी करण्यास गडबड करतात.

जिरायती विभागातील शेतकरी वर्षात दोन पिके घेतात. खरिपात सोयाबीन तर ते काढून रब्बी हंगामातील शाळू पीक घेतले जाते. त्यातील एक पीक उत्पादन खर्चात गेले तर दुसरे पीक फायद्याचे ठरते. गतवर्षी शाळवाला चांगला भाव मिळाला होता. क्विंटलचा दर 4 हजार 700 रुपये दरम्यान होता.  शेकडा शाळवाच्या पेंडीचा दर 1 हजार 300  रुपयांच्या दरम्यान होता.

सध्या सोयाबीन पिकाची काढणी करून शेतातील खुरपणी करून पेरणी केली जात आहे. ही पेरणी करताना बरेच शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करत आहेत.  अपवादानेच बैलाची पेरणी दिसत आहे.

जिरायती विभागातील शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेवून शाळू पिकाचे  उत्पादन घेतात. निसर्गावर अवलंबून असणारी शेती असल्याने उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकवेळा पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास हातचे पीक  जाते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!