आंतरजिल्हा, शहरांतर्गत प्रवासासाठी ई-पास सुविधा देण्यास प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा , दि. २४: जिल्ह्यात संचारबंदी कडक केली असली तरी काहीजणांना अत्यावश्यक, वैद्यकीय, अंत्यसंस्कार कार्यक्रम अशा कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्यांना परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ऑनलाईन ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कोवीड ई-पास कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पोनि विजय कुंभार यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ब्रेक द चेन आदेश निर्गमित केलेले आहेत. या आदेशानुसार आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी वैद्यकिय कारण, अंत्यसंस्काराचा कार्यक्रम किंवा कुटुंबातील गंभीर आजारपणाचे कारणासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि अनेक ठिकाणी चेक पोस्टवर नागरीकांना सोयीस्करपणे प्रवास करता यावा, यासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी प्रवासाचा परवाना/पास असल्यास नागरीकांना सोयीस्कर होईल याकरीता ई-पास देण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरीकांना ऑनलाईन ई-पास देण्याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे कोविड -19’ ई – पास कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

ज्या नागरीकांना ब्रेक द चेन आदेशानुसार वैध कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावयाचा असेल त्यांनी https://covid19.mhpolice.in/ या लिंकचा वापर करुन त्यामधील दिलेल्या सूचनांचे पालन करून आपली आणि आपले सहप्रवासी यांची माहिती, प्रवासाचे कारण, प्रवासाचे चालू ठिकाण व अंतिम ठिकाण याबाबतची आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून ई-पास करीता ऑनलाईन अर्ज करावा. ज्या नागरीकांना इंटरनेट सेवा तसेच मोबाईल वापरता येत नाहीत, अशा नागरिकांना ई-पास हवा असल्यास पोलीस ठाण्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ई-पास मार्गदर्शन पथक निर्माण करण्यात आलेले आहे, असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!