स्थैर्य, सोलापूर, दि.21: सोलापूर शहर व जिल्ह्यातील खासगी दवाखाने डॉक्टर व संस्थांनी तात्काळ सुरू कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिला.
पालकमंत्री भरणे म्हणाले की, सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार चर्चा करण्यात आलेली आहे, मात्र दवाखाने सुरू नसल्याच्या सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासन व माझ्याकडे प्राप्त होत आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील डॉक्टर बंधू-भगिनींना मी आवाहन करतो की, खासगी दवाखाने बंद असल्यामुळे सिव्हिल रुग्णालयावर ताण वाढलेले आहे. खासगी दवाखाने सुरू झाल्यास विविध आजारावर रुग्णांना उपचार मिळेल. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येणे शक्य होईल. ‘आयएमए’कडून जिल्हा प्रशासनाला सुमारे सव्वाशे रुग्णालये सुरू असल्याची यादी सादर करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही नागरिकांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत, त्यामुळे शहरातील सर्व खासगी डॉक्टरांना आणि ग्रामीण भागातील लोकांनी त्यांचे दवाखाने सुरू करावेत.
डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्यासाठी अडचणी असल्यास त्या जिल्हा प्रशासनाकडून सोडवल्या जातील. त्यासाठी सुरक्षाविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. सोलापूर महानगरपालिकेने दवाखान्यांना नोटीस बजावल्या आहेत. नागरिकांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून सदरील नोटीस बजावले आहे. आता दवाखाने सुरू केले गेले नाही तर प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर कारवाई करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिला आहे.