दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘पुरोगामी महाराष्ट्र रसातळाला घेऊन जाण्याची कृती थांबवण्याचं काम शरद पवार करत आहेत. महाराष्ट्राच भविष्य सुरळीत व्हावं या उद्देशाने कुठलाही स्वत:चा फायदा नसताना याही वयात शरद पवार ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मतदारांनी घ्यावी. लोकसभेपेक्षा दुप्पट ताकदीने विधानसभेला आपल्याला तुतारी फुंकायचीय; त्याचा आवाज दिल्लीला गेला पाहिजे’’, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता.फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. व्यासपीठावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम, नितीन भोसले, भगवानराव होळकर, शंकरराव माडकर, राजाभाऊ भोसले, सतीश माने, सौ. रेश्माताई भोसले, शंभुराज खलाटे, सुधीर भोसले, विकास नाळे आदींची उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, ‘‘ज्यांच्यासोबत आपण आजवर एकत्र काम करत आलोय; त्यांच्याशीच आपण आज भांडतो आहे. भाजपचा हा कावा जनतेने लक्षात घेतला पाहिजे. हे सर्व घडवून कुणी आणलं? महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करणारा धनी कोण आहे? याचा शोध घेवून त्याचा समूळ नायनाट आपल्याला येत्या 20 नोव्हेंबरला करायचा आहे.’’
‘‘आपले उमेदवार दीपकराव चव्हाण हे 15 वर्षापूर्वी जसे होते तसेच आजही आहेत. सुसंस्कृत, सुशिक्षीत, नेत्याच्या आणि ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या ठायी त्यांची निष्ठा आहे. लोकांच्या सुख:दुखात समरस होणारा आपला उमेदवार आहे. मतदारसंघाला कमीपणा येईल अशी त्यांची एकही कृती आपल्याला दाखवून द्यावी. शिवाय विधानसभेमध्ये एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यामुळे हातात अमृताचा पेला असताना विषाची परीक्षा घ्यायला जावू नका. आपले उमेदवार दीपक चव्हाण यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या’’, असेही आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी मतदारांना केले.