दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे, यासह अन्य मागण्यांसाठी गेल्या पावणेदोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पगार मिळाल्याने काही कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत. परंतु अद्याप एसटीबसची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. या 50 दिवसांत परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाला सुमारे 20 कोटी 50 लाख रूपयांचा महसुल बुडाल्याने अर्थकारणाला चांगलाच फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे एसटीबसची सेवा बंद असल्याने कर्मचाऱ्यांवर पगाराविना उपासमारीची वेळ आली होती. यातच तुटपुंजे वेतनात वाढ होत नसल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले होते. एसटी तोट्यात असल्याचे सांगत परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या कागदावरच ठेवल्या. यामुळे वैतागलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला. या संपामुळे जिल्ह्यातील 11 आगारातून सुमारे 700 हून अधिक एसटीच्या दररोज हजारो फेऱ्या होत असतात. प्रवाशी वाहतुकीमधून एसटीला दररोज 50 लाख रूपयांचा महसूल मिळत असतो. परंतु संपामुळे जिह्यातील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली. यांचा फायदा खाजगी वाहनांना झाल्याने अनेक खाजगी वाहने तिकिटाचा दर दुप्पट आकारात आहेत. यामुळे चाकरमान्याची मोठी गैरसोय होत आहे. या संपाचा परिणाम मालवाहतुकीवर देखील झाला आहे. सातारा विभागातील 11 आगारामधील मालवाहू बसेस जागेवरच थांबल्या आहे. त्यामुळे लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे.
413 कर्मचारी निलंबित
सातारा आगाराचे तब्बल 413 कर्मचारी निलंबित करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली . एकूण 2380 पैकी 1134 कर्मचारी कामावर हजर झाले असून यामध्ये 176 चालक व वाहक यांचा समावेश आहे . पुरेशा मनुष्यबळाअभावी सातारा आगाराची 700 फेऱ्यांची क्षमता असताना केवळ 350 फेऱ्या होत आहेत . अजूनही सर्व कर्मचार्यां नी कामावर हजर व्हावे असे आवाहन पळसुले यांनी केले.