
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असतानाच, राजे गटाच्या भूमिकेबाबत आणि चिन्हाबाबत सुरू असलेला संभ्रम आता संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत. राजे गट हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणूक लढवणार असून, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हेच गटाचे नेतृत्व करणार असल्याची खात्रीलायक माहिती ‘स्थैर्य’ला मिळाली आहे.
श्रीमंत अनिकेतराजे हे विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी यापूर्वी नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून कामकाज पाहिले असून, शहराच्या राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली गट निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजे गट कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम होता. आता त्याच चिन्हावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
यंदाची नगरपरिषद निवडणूक ही राजे गटासाठी ‘अस्तित्वाची लढाई’ मानली जात आहे. गेल्या काही महिन्यांत गटातील अनेक दिग्गज नेते आणि माजी नगरसेवकांनी खासदार गटात (महायुती) प्रवेश केल्याने राजे गटाला मोठे धक्के बसले आहेत. गटाची ही पडझड रोखण्यासाठी आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी राजे गटाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ३० वर्षांची एकहाती सत्ता टिकवण्यासाठी गट सर्व शक्ती पणाला लावणार आहे. श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘धनुष्यबाण’ या अधिकृत चिन्हावर ही लढाई लढली जाणार असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत राजे गटाचे सर्व उमेदवार ‘धनुष्यबाण’ चिन्हाचे एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीने (खासदार गट) यापूर्वीच अनेक अर्ज दाखल केले असून, त्यांचे उर्वरित अर्जही आजच दाखल होणार आहेत.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी दोन्ही गटांकडून अधिकृत उमेदवार कोण असणार, हे स्पष्ट होईल. राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे यांचे नाव निश्चित मानले जात असताना, खासदार गटाकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर की दिलीपसिंह भोसले, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

