राज्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘बोट रेस’ स्पर्धेचे आयोजन करणार – क्रीडामंत्री सुनील केदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील बोट रेस स्पर्धेचे जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

बोट रेस संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील जास्तीत-जास्त संघ बोट रेस या स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येतील. ही स्पर्धा सिलिंक, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्याकरिता भारतीय नौदल यांच्यासोबतही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी स्पर्धा घेणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ राज्यात सुरु करण्यात आले आहे. याची माहितीही या निमित्ताने क्रीडा प्रेमींना होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी बोट रेस स्पर्धेसाठी सैनिक फेडरेशन कडून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

ओव्हल मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना

ओव्हल मैदान येथील काही भाग सर्वसामान्य गरीब, कष्टकरी खेळांडूना  फुटबॉल व अन्य खेळांसाठी आरक्षित करण्याबाबत क्रीडा आयुक्त यांना प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना  क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. यावेळी आमदार भाई जगताप व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!