जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊन खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२३ । मुंबई । जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासन आणि एफ सी बायर्न, महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टीव्ही 9 यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 14 वर्षाखालील फुटबॉल खेळाडू जर्मनीत गेले आहेत. या खेळाडूंनी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जर्मनीत निवड होवून प्रशिक्षणासाठी आलेल्या फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, क्रीडा उप सचिव सुनील हंजे तसेच एफसी बायर्न क्लबचे भारतातील प्रतिनिधी कौशिक मौलिक आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ राज्यात रुजावा. राज्यातील खेळाडूंना या खेळामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासनाचा क्रीडा विभाग व एफसी बायर्न म्युनिक फुटबॉल क्लब, जर्मनी यांच्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र करंडक नावाने 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास 1 लाख मुलांनी सहभाग घेतला.

म्युनिक – जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी, एफसी बायर्न फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट 20 फुटबॉलपटूंची निवड केली. जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे दि. 19 ते 26 मे 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

राज्यात फुटबॉल खेळास चालना मिळावी, तसेच राज्यातील खेळाडूंना या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य तंत्र आत्मसात करता यावे व प्रशिक्षण मिळावे आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे शिष्टमंडळ जर्मनी येथे गेले आहे. हे शिष्टमंडळ म्युनिक येथे गेले असता या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणारे इंटरनॅशनल यूथ एक्सचेंज फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मीरजम एसिले, वरिष्ठ सल्लागार पीटर लीबल, युवा प्रशिक्षक डॅनिअल व ॲलेक्स यांचा राज्य शासनाच्यावतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्‍मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!