
स्थैर्य, फलटण, दि. २९ : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या माध्यमातून करोना प्रादुर्भाव रोखण्याबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागात बाजार समितीच्या फिरत्या दवाखान्याद्वारे सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली, ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्याचा लाभ घेतल्यानंतर आता ही सुविधा फलटण शहरातील एकेका प्रभागात देण्यात येत असल्याचे बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये आज गुरुवार दि. २८ रोजी या प्रभागाच्या नगरसेविका, स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाच्या प्रमुख ॲड. सौ.मधुबाला दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या फिरता दवाखाना आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, नागरिकांनी ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सुमारे ७५० नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.
सदर फिरत्या दवाखान्याचे ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या नागरिकांचे थर्मल स्कॅनरद्वारे टेम्परेचर नोंद करण्यात आले, त्यानंतर रुग्णांनी मास्क परिधान केले असलेची खात्री करुन, हँडसॅनिटायझर देऊन, अत्यंत शिस्तबद्ध आणि सोशल डिस्टन्ससिंग सांभाळून सर्वांची वैद्यकीय तपासणी व मोफत ओषधोपचार उपक्रम राबविण्यात आला. यावेळेस उपस्थित सर्व नागरिकांची नाव नोंदणी करणेत आली. डॉ.धनश्री शिराळकर आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
सदर उपक्रम राबविताना बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांचे सहकार्य लाभले.
प्रभाग ११ मधील नागरिकांना करोना आजाराबाबत सविस्तर माहिती देऊन सदर आजार टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता समजावून देत उत्तम जनजागृती करण्यात आली. बाजार समिती व नगर परिषद यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत केल्याची माहिती सद्गुरु हरिबुवा महाराज पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी यावेळी दिली.