दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहर पिंजून काढले असून त्यांच्या प्रचार दौर्याला महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.
‘‘माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात महायुतीकडून सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढत देत आहेत. महायुतीच्या सरकारने महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलेंडर, एस.टी.मध्ये प्रवास सवलत अशा उपयुक्त योजना राबवून महिलांचा सन्मान केला आहे. या योजना अशाच सुरु राहण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून त्यामध्ये आपला फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघ मागे राहणार नाही’’, असा विश्वास त्या महिला मतदारांशी संवाद साधताना व्यक्त करत आहेत.
‘‘रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदारकीच्या काळात लक्षवेधक विकास कामे करुन दाखवली आहेत. रेल्वे, रस्ते, पाणी यासाठी केंद्रातून कोट्यावधीचा निधी आणला आहे. आत्ता ते खासदार नसले तरी भाजपच्या माध्यमातून विकास निधी आणत आहेत. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीतून आपल्या सचिन पाटील यांना तुम्ही आमदार केल्यास रणजितदादा आणि अजितदादा या दोन्ही दादांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्याचा विकास दुप्पट वेगाने होणार आहे. त्याकरिता येत्या 20 तारखेला तुम्ही परिवर्तनाचा निर्धार करुन सचिन पाटील यांना विजयी करा’’, असे आवाहनही अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी मतदारांना केले आहे.
दरम्यान, अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रचारदौर्यावेळी ठिकठिकाणी महिला वर्ग त्यांचे औक्षण करुन, फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करत आहे. ज्येष्ठ महिला त्यांना आपुलकीने अलिंगन देवून आशिर्वाद देतानाचेही भावनिक चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. या दौर्यामध्ये त्यांच्यासमवेत भाजप, राष्ट्रवादी सह शिवसेना व अन्य मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत.