स्थैर्य, कोळकी, दि. १७ : सध्या संपूर्ण फलटण तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. कोळकी हे गाव मोठे असल्याने व दाट लोकवस्ती असल्याने कोळकी मध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्या रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच कोळकी मध्ये हाय रिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी सहा विशेष टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या मध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी व आशा सेविका व आरोग्य सेवक अश्या विविध सहा टिम ह्या कोळकी गावांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या बाबतचे आदेश फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी पारित केलेले आहेत.
कोळकी गावामधील वनदेवशेरी, निंबाळकर वस्ती, मरिमाता नगर, जाधव वस्ती, अब्दागिरे वस्ती, क्षिरसागर वस्ती व पंढरपूर रोड वरील वस्ती अशी पहिली टिम असेल. तर गणेशशेरी, गोविंद डेअरी पाठीमागील भाग, पद्मावती नगर, खराडे हॉस्पिटल पाठीमागील भाग, राधिका गार्डन परिसर ह्या भागासाठी दुसरी टीम कार्यरत असेल. मालोजीनगर ह्या भागासाठी तिसरी टीम कार्यरत असेल. शारदानगरचा पुर्व व पश्चिम भाग, पखाले वस्ती, दंडीले वस्ती, शेंडे वस्ती, महादेव नगर, नाळे वस्ती ह्या भागासाठी चौथी टीम कार्यरत असेल. बुवासाहेब नगर, सावतामाळी नगर व पखाले वस्ती ह्या भागासाठी पाचवी टीम कार्यरत असेल. अक्षत नगर व अजित नगर ह्या भागासाठी सहावी टीम कार्यरत असेल, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी संबंधित आदेशात नमुद केलेली आहे.