रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सर्व मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांना विशेष सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, रायगड, दि.१७: “तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रति तास 80-90 किमी असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्येक तालुक्याचे तहसिलदार गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे नगरपालिका मुख्याधिकारी यांना काही विशेष सूचना दिल्या आहेत.

या सूचना पुढीलप्रमाणे:-

वाऱ्याच्या वेगाने जुनी झाडे, फांद्या पडू शकतात, वीजेचे जुने खांब उद्ध्वस्त होऊ शकतात, जुने होर्डिंग्ज किंवा कोणताही पक्का आधार असलेल्या वस्तू हवेत उडू शकतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे याची खात्री करुन घ्यावी व धोकादायक वस्तू तात्काळ काढून घ्याव्यात. सखल भागात नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपातील सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलविण्यात यावे. सर्व शासकीय कार्यालयांनी त्या कार्यालयाच्या खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. काच / लाकडाच्या बारीक तुकड्यामुळे (स्प्लिंटर्समुळे) कोणालाही त्रास होऊ नये, त्या तुकड्यामुळे कोणी जखमी होऊ नये,यासाठी काचेच्या खिडक्या व दरवाजे यांना पडदे/कापड लावावे.

याव्यतिरिक्त याआधीही देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे, नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी, सर्व यंत्रणांनी एकत्रित समन्वय साधून कोणत्याही प्रकारची मोठी हानी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!