
स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑगस्ट : फलटण शहरातील आणि तालुक्यातील ब्राह्मण समाजातील युवा उद्योजकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत योजने’अंतर्गत एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेद्वारे नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा सध्याच्या व्यवसायाच्या वाढीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा केला जाणार असून, याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या फलटण शाखेने पुढाकार घेतला आहे.
या महत्त्वपूर्ण योजनेची माहिती देण्यासाठी बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता फलटण शहरातील यज्ञ मंगल कार्यालय, ब्राह्मण गल्ली येथे एका विशेष माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. उमेश विरधे आणि बँकेचे संचालक श्री. विनायकजी हरिदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमामध्ये, बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री. विशाल तपकिरे हे ‘अमृत कर्ज योजने’बद्दल सविस्तर माहिती सादर करणार आहेत. या योजनेचे स्वरूप, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि कर्ज मिळवण्याची प्रक्रिया यावर ते प्रकाश टाकतील. या योजनेचा लाभ घेऊन युवा उद्योजकांनी आत्मनिर्भर व्हावे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
तरी, या संधीचा लाभ घेण्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व ब्राह्मण युवा उद्योजकांनी आणि समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर अर्बन बँकेचे फलटण शाखाधिकारी श्री. अमेय देशपांडे यांनी केले आहे.