सातारा येथे खा.शरद पवार यांना पत्रकारांच्यावतीने ‘संकटमोचक’ हे विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी ना.दिलीप वळसे पाटील, रविंद्र बेडकिहाळ, हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी. |
स्थैर्य, फलटण : ‘देशावर वा महाराष्ट्रावर कधीही कोणतीही आपत्ती कोसळली तर विघ्नहर्ता श्री गणेशाप्रमाणे दत्त म्हणून शरद पवार संकटमोचक विघ्नहर्ता म्हणून सर्वत्र धावून जातात त्यामुळे आपद्ग्रस्तांना वेळेवर मदतीचा हात मिळतो. याही वयात ते यामध्ये अजूनही कमी पडत नाहीत’ याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्रकारांच्यावतीने ‘संकटमोचक विघ्नहर्ता’ हे सन्मानपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खा.शरद पवार यांना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले.
पत्रकारांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमुळे ‘शरद पवार यांना खरोखरच हत्तीचे बळ प्राप्त होईल’ या अर्थाने या सन्मानपत्रातील भावना अतिशय महत्त्वाची आहे, असे राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री ना.दिलीप वळसे – पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.शशिकांत शिंदे यांच्यासह सातारा शहरातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.