जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि कोरोनाविषयक जनजागृतीसाठी डिजिटल चित्ररथांद्वारे विशेष मोहीम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औरंगाबाद, दि. २९: जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि  कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 9 डिजिटल चित्ररथांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 26 मार्च रोजी हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हयाच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, सामाजिक अर्थसहाय्य विभागाच्या विविध योजना आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी यांच्या कल्पकतेतून हे अभियान सुरु करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे. डिजिटल चित्ररथासोबत योजनांची माहिती देणारे प्रचार साहित्य देखील वितरित केले जाणार आहे. आज या अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले,  उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी यावेळी उपस्थित होते.

या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित कोविड लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, आम आदमी योजना,  सोबत सामाजिक न्याय विभागाच्या विशेष अर्थसहाय्य योजना जसे-कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर योजनांची माहिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवून जनमाणसात  विस्तृत जनजागृती करण्यात येणार आहे.

या चित्ररथाच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तसेच सामाजिक न्यायाच्या अर्थसहाय्य व इतर योजनाची माहिती नागरिकांनी जाणून घेवून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाने एकत्रितपणे डिजिटल व प्रिंट माध्यमाचा वापर करीत ही योजना आखल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. सामाजिक न्याय विभागाच्या योजना व सामाजिक आर्थिक योजना सर्वाधिक लाभार्थी असणाऱ्या योजना आहेत गरीब गरजू आणि मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ग्रामिण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान निश्चित उपयोगी पडेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी या अभियानाच्या आयोजनामागील भूमिका विषद यावेळी केली.

सामाजिक आर्थिक योजनांची घडी पुस्तिका, पत्रके, कोरोना विषयक जनजागृती, सामाजिक न्याय विभागाची घडी पुस्तिका व पत्रके यांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!