
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । फलटण । श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ (विमानतळ) येथील स्वच्छता आणि साठलेला कचरा उचलण्याची विशेष मोहिम आज मंगळवार दि.५ जुलै रोजी सकाळी ०८:३० पासून सुरु करण्यात येत आहे. फलटणकर नागरिक, स्वयंसेवी आणि सहकारी संस्था, शिक्षण संस्थांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येथून पुढे गेल्यानंतर पालखी तळासह (विमानतळ) संपूर्ण शहर व परिसराची स्वच्छता श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षी करण्यात येत असून यावर्षीही ती परंपरा अखंडित सुरु ठेवण्यात आली आहे.
या मोहिमेत शहर व तालुक्यातील शिक्षण संस्था मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था मधील आजी/माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी, यांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करताना पहिल्या टप्प्यात विमानतळ आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात अन्य भाग घेण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.