अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात मानवी मूल्यांची पेरणी – ताराचंद्र आवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
प्रत्येकाने आपले आयुष्य कसे जगावे, हे ठरविले पाहिजे. मानवी जीवन ही एकदाच मिळालेली संधी आहे. तिचा योग्य उपयोग करून घेतला तर जीवनाचे नंदनवन होते. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवी मूल्यांची पेरणी करताना दिसते. त्यांच्या साहित्यात मानवतावाद तसेच माणुसकीचे दर्शन घडते व अन्यायाविरुद्ध चिड निर्माण झालेली दिसते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे समजून घेणे काळाची गरज आहे, असे मत प्रमुख वक्ते व साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पंचबिघा गोखळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव गावडे, प्रगतशील शेतकरी डॉ. राधेश्याम गावडे, मार्केट कमिटी संचालक डॉ. ज्ञानदेव गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, जयंती, पुण्यतिथी साजरी करताना माणसांचे विचार सुधारण्यासाठी वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. बालपणापासून बंडखोर असणारे अण्णाभाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, कविता, लावणी, छक्कड, पोवाडे, प्रवासवर्णन, वगनाट्य, नाटके, चित्रपट गीते असे विपुल लेखन केले. त्यांच्या साहित्याला शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्यांची साहित्य संपदा म्हणजे मानवी मूल्यांचा खजिना आहे. म्हणून त्यांचे साहित्य वाचले पाहिजे व जगण्याची दिशा ठरवली पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है’, म्हणून प्रबोधन करणारे ते आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते.

यावेळी वृषाली भिसे या विद्यार्थिनीने रोखठोक भाषेत आपले मत मांडले. तसेच बापू दणाने या विद्यार्थ्याने बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला, याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक विजय केंगार यांनी आपल्या सुश्राव्य वाणीने केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष रणजित दणाने, संदीप पाटोळे, प्रशांत दणाने, अजय आवळे, सोमनाथ दणाने व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!