स्थैर्य, कोलकता,दि .२८: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, गांगुली यांना पुन्हा छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
गांगुली यांना यापूर्वी 2 जानेवारीला हार्टअटॅक आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
गांगुलीवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाली
गेल्या वेळी तब्येत बिघल्यामुळे गांगुलीवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली होती. 5 जानेवारी रोजी ज्येष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ. देवी शेट्टी यांनी म्हटले की, “गांगुली यांना कोणतीही मोठी समस्या नाही. कोरोनरी धमनीमधील अडथळा सर्व भारतीयांना ज्ञात आहे. त्यांना हृदयाची काहीही तक्रार नाही. 48 वर्षीय गांगुलीचे हृदय 28 वर्षांपूर्वी जसे होते आजही तसेच आहे.”
पंतप्रधान मोदी कुटुंबीयांशीही बोलले होते
मागील प्रकृती बिघडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांगुलीची पत्नी डोना यांच्याशी बोलले होते आणि गांगुलीच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली होती. त्याआधी गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली होती. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या.
गांगुलीने म्हटले – शरीर जसे प्रतिक्रिया देईल तसे करू
7 जानेवारी रोजी गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता, तेव्हा त्यांनी आराम करण्याच्या प्रश्नावर मीडियाला म्हटले होते की, त्यांचे शरीर तशी प्रतिक्रिया देईल तसे करणार आहे.