दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । सातारा । लग्नात दिलेले संसारोपयोगी साहित्य तसेच कपडे आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना सासरच्या माणसांनी मारहाण केल्याचा प्रकार सातारा तालुक्यातील पाटखळ येथे घडला आहे. याप्रकरणी सासरच्या तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मंदाकिनी शिंदे, नीलकंठ शिंदे, संदीप शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, नीलम प्रदीप शिंदे (वय २८, रा. ३६६, यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नात दिलेले संसारोपयोगी साहित्य तसेच कपडे घेण्यासाठी त्या पाटखळ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांना सासू मंदाकिनी आणि सासरा नीलकंठ या दोघांनी रोखत ‘घरात यायचे नाही, तुझा येथे काही संबंध नाही. घरात कशाला हात लावायचा नाही,’ असे बोलून घरातून हाकलून लावत शिवीगाळ केली. यानंतरही नीलम यांनी घरातील साहित्य गाडीत ठेवण्यासाठी चुलते अनिल यांचेकडे देत असतानाच नीलकंठ आणि संदीप (रा. पाटखळ, ता. सातारा) या दोघांनी अनिल यांना धक्काबुक्की करत हाताने मारहाण केली. ही मारामारी सोडविण्यासाठी नीलम यांची चुलती अर्चना आणि आजी गंगूबाई पुढे आल्या असता सासू मंदाकिनी हिने कोयत्याच्या दांड्याने आजी गंगूबाई यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. यावेळी मंदाकिनी यांनी अर्चना यांनाही मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नीलम यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मंदाकिनी, नीलकंठ आणि संदीप या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राजेंद्र तोरडमल करत आहेत.