जावलीचे सुपुत्र, जवान देविदास रजपूत यांचे निधन; आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

राजस्थानमध्ये कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका; प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सैन्यदलात झाले होते दाखल


स्थैर्य, जावली, दि. २३ ऑगस्ट, अजिंक्य आढाव : जावली (ता. फलटण) गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान देविदास दिलीप रजपूत (वय ३१) यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते राजस्थानमधील जोधपूर येथे कार्यरत होते. या घटनेमुळे जावली गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

जवान देविदास रजपूत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जावली येथे आणण्यात आले असून, आज, शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या देविदास यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले होते. वडिलांच्या अपघाती निधनानंतर आईने त्यांचा सांभाळ केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जावली जिल्हा परिषद शाळेत, उच्च माध्यमिक शिक्षण फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात, तर प्राणीशास्त्र (झूलॉजी) विषयातील पदवी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी मिळवली होती. शिस्तप्रिय आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून ते तरुणांमध्ये ओळखले जात.

सन २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. लखनऊ येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीर आणि पुणे येथेही देशसेवा बजावली. त्यांचा लहान भाऊ अमर हा सुद्धा सैन्य दलात कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई आणि आजी असा मोठा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!