विकास कामे पाहता काही लोकांना पोटदुखी – समशेरसिंह नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
विविध समाजाच्या थोर पुरूषांच्या जयंतीचे अध्यक्षपद मागून घेण्याबरोबर थोर पुरूषांच्या पुतळा उभारणीसाठी पुढे यावे. समाजामध्ये व जाती-जातीत भांडणे लावणार्‍यांना तालुक्यात व शहरात होऊ घातलेली विकास कामे पाहता काही लोकांना पोटदुखी होत आहे, असा आरोप नाव न घेता नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलटण शहरात विविध कामे मंजूर करण्यात आली असून याबाबत आरोप-प्रत्यारोप होत आहेत, या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत बोलताना पुढे सांगीतले की, खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलटण नगर परिषदेच्या विविध भागात ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी ५० लाख रुपये व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा अर्धपुतळा बसवण्यासाठी २० लाख रुपये व इतर विविध कामांना मिळून ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजर करण्यात आला असून दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी नगर विकास विभाग यांनी याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी खासदार फंड १५ लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी खासदार फंडामधून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, हे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण शहरातील मुख्य विविध पुतळ्यांना निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने सर्व समाजातील समाजबांधव यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुसतेच कागदावर ठराव व कामे मुंर करत कागद नाचवण्याऐवजी प्रत्यक्षात का विकास कामे करण्यात आली नाहीत, याचा खुलासा करावा. अनेक वर्ष नगर परिषदेत सत्ता असतानाही शहरातील एकाही पुतळ्याचा पूर्ण विकास न करणार्‍यांनी विकासाची भाषा करू नये. शहरात ठराविक पुतळ्याचा विकास करत काही पुतळे विकसित न करणे तसेच नव्याने न उभारणे यामागे विकृत राजकीय मानसिकता असणार्‍यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये. विविध समाजाच्या थोर पुरूषाच्या जयंतीची मागून अध्यक्षपद घेऊन पावत्या गोळा करण्याऐवजी विविध समाजाच्या थोर पुरुषांचे पुतळे कसे विकसित केले जातील, हे बघायला हवे होते.

रस्त्यावर अतिक्रमण करून बंगल्यास कंपाऊंड कोणत्या निधीतून केले, याचा खुलासापण करावा शहरातील खुल्या जागेचे आरक्षण उठवून भूखंड बळकवणार्‍यांनी शहरातील विकासावर न बोललेले बरे. अनेक वर्ष आमदारकी तसेच जिल्हा परीषद अध्यक्षपद याचबरोबर नगर परिषदेत सत्ता असतानाही छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य म. फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विकासकामे का केली नाहीत, यावर त्यांनी बोलावे.आम्ही ठराविक पुतळ्याचा विकास न करता चारही पुतळ्यांच्या विकासकामांची मंजुरी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी घेतली असून छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांची विकास कामे वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून तर क्रांतीसूर्य म. फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांची विकासकामे खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या खासदार फंडातून मंजूर केली आहेत.

हडको कॉलनी भूखंड मधील ओपन प्लॉट व रस्ता यावर अतिक्रमण करणार्‍या जवळच्या कार्यकर्त्याची अतिक्रमणे विकास कामात आडवी येताना नेते मंडळींना दिसत नाहीत का? जनतेने आम्हाला दिलेली संधी आम्ही आमच्या विकास कामातून दाखवून देणार आहोत.आम्हाला कोणत्याही ठेकेदाराचे घर भरण्यासाठी तसेच ठेकेदार कंपनीत शेअर होल्डर व्हायचे नाही. गजानन चौक येथील महात्मा गांधी यांचा जो पुतळा उभा करण्यात आला आहे, त्या थोर पुरुषांच्या विकास कामात पैसे खाणार्‍यांनी मूर्तिकराला किती पैसे दिले, निम्मेच पैसे देऊन पुतळा बसवला आहे, हा संशोधनाचा भाग आहे. जनतेला दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्यासाठी विकास कामे करायची आहेत. आम्हाला कोणत्याही समाजाच्या जयंतीची अध्यक्षपदे नको आहेत. आम्हाला विविध समाजाच्या त्या त्या थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विकासकामे करायची आहेत. जी कामे इतक्या वर्षात झाली नाहीत ती कामे आम्ही पाच वर्षात करून दाखवली आहेत. जनतेने जातीयवादी लोकांना थारा देऊ नये, असे यावेळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!