दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील संत बापूदास नगरातील काही रहिवाशी कुटुंबांना गेल्या १० वर्षांपासून पाणीपुरवठाच होत नसल्याचे रहिवाशांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे केलेल्या तक्रारींवरून समोर आले आहे. या कुटुंबांना पाणी मिळण्याबाबत कोणीही लक्ष घालत नसल्याने ही कुटुंबे नगर परिषदेच्या कामकाजावर नाराज आहेत. या कुटुंबांना पाणीपुरवठा व्हावा, अशा प्रकारचे निवेदन या रहिवाशांनी नुकतेच नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दहा वर्षांपासून संत बापूदास नगरातील काही कुटुंबांना पाणीपुरवठा होत नाही. याबाबत या कुटुंबांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागास वारंवार कळवूनही या समस्येबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. फक्त आश्वासने व उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, अशी या पीडित कुटुंबांची तक्रार आहे.
हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या कुटुंबांनी नुकतेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.