महिलांना मानाचे स्थान दिले तरच समाज पुढे जाईल – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । सोलापूर । समाजातील महिलांची संख्या जवळपास 50 टक्के आहे. त्यामुळे त्यांना समाजात मानाचे, हक्काचे स्थान दिले तरच समाज पुढे जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे व्यक्त केले.

नियोजन भवन सभागृहात महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार ढोक, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार अंजली मरोड आणि अंजली कुलकर्णी, प्रमुख व्याख्यात्या ज्योती वाघमारे, सुधा अळ्ळीमोरे, उद्योजिका अनिता माळगे, जलतरणपटू कीर्ती भराडिया यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, समाजात महिलांची संख्या निम्मी असली तरी बऱ्याच ठिकाणी महिलांच्या बाबतीत भेदभाव दिसून येतो. त्यांच्यावर अन्यायाची भावना निर्माण होते. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, इतर यशस्वी महिलांपासून प्रेरणा मिळावी, यासाठी महिला दिन साजरा केला जातो. अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंदिन जीवनात काम करताना निश्चित ताण तणाव येतो. शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी जीवन जगण्याची कला शिकून घ्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजच्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्यांनी जीवन जगण्याची कला या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचा अवलंब महिलांनी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, कीर्ती भराडिया व अनिता माळगे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्योती वाघमारे यांनी सउदाहरण महिलांना त्यांची बलस्थानांविषयी तसेच, सुधा अळ्ळीमोरे यांनी योगसाधनेमुळे होणारे फायदे व दैनंदिन जीवनात त्यांची उपयुक्तता यावर मार्गदर्शन केले. शमा पवार ढोक यांनीही मार्गदर्शन केले. अनिता माळगे, कीर्ती भराडिया यांनी अनुभवांसह मनोगत व्यक्त करून संधी मिळाली तर तिचे नक्की सोने करा, असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उद्योजिका अनिता माळगे, जलतरणपटू कीर्ती भराडिया, प्रमुख व्याख्यात्या ज्योती वाघमारे, सुधा अळ्ळीमोरे यांचा सत्कार करण्यात आला. अंजली मरोड यांनी आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!