दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी


स्थैर्य, सातारा, दि.३१: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आरोपी शिवकुमार असला तरी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करणार्‍या इतर आरोपींनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे, वैशाली दुबळे, नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे आदींनी राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक शिवकुमार ह्यांनी दिलेला त्रास तसेच अश्‍लील बोलून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याने आत्महत्या केली आहे. ह्या प्रकरणात अमरावती शिवकुमार पोलीसांनी नागपुरातून अटक केलीय. मात्र ह्या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप मृत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली यांनी केले आहेत. रेडडी नावाचे अपर प्र. मु. व. संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती ह्यांनी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्रारी वर कुठलीही कार्यवाही केली नाही. महिला अधिकार्‍याचा छळ आणि आत्महत्या प्रकरणात रेडडी नावाचे अधिकारी देखील दोषी असल्याचे दिसते. सबब या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर दोषी अधिकारी ह्यांना सह आरोपी करण्याची मागणी आमच्या वतीने करण्यात येत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणार्‍या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माध्यमातून समोर आले आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.  या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रेडडी ह्यांचे नावे लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप आहेत, शिवकुमार नावाचे अधिकारी गावकर्‍यासमोर, मजुरां समोर शिवीगाळ करतात. एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अधिकारी कुठेही बोलवतात, अश्‍लील बोलतात, असे दीपाली ह्यांनी नमूद केले असून रेड्डी ह्यांचेकडे तक्रार केली असता रेड्डी हे शिवकुमार ह्यांना पाठीशी घालतात, असे नमूद आहे.

केलेल्या कामाचे पैसे न काढणे, सुट्ट्या नाकारणे, न्यायालयाचा निर्णय असताना रुजू न करून घेणे, असे देखील नमूद आहे. शिवकुमार ह्यांच्या असंख्य तक्रारी असताना रेड्डी गांभीर्याने घेत नसल्याने मेळघाट दलदल बनल्याचा आरोप देखील केलेला आहे. मृत महिला अधिकारी दिपाली ह्यांचे आरोप पाहता वन विभाग हा महिला अधिकारी ह्यांचे करीता छळ छावणी बनला आहे असे दिसते. वन विभागाचे अधिकार्‍यांना महिला अधिकारी व कर्मचारी सहज सावज वाटतात. वरीष्ठ अधिकारी ह्या तक्रारीवर कार्यवाही करीत नसल्याने एका महिला अधिकार्‍याला जीव द्यावा लागला. वन विभागाने कामाच्या ठिकाणी होणारी महिला अधिकारी, कर्मचारी ह्यांच्या लैंगिक छळ ह्यावर काहीही तरतूद केल्याचे दिसत नाही. सबब महाराष्ट्रभर वनविभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा होणे गरजेचे आहे.

दीपाली चव्हाण प्रकरणात शिवकुमार व इतर अधिकारी ह्यांचे बाबत केलेल्या आरोपा नुसार सहभागी सर्व अधिकारी सहआरोपी करण्यात यावे, वन विभागाचे सीसीटीव्ही डेटा जप्त करून त्याची तपासणी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर गणेश दुबळे, वैशाली दुबळे, नंदकुमार धनवडे, अनिता धनवडे यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे वनमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र, वनविभाग सिव्हिल लाइन्स नागपूर आदींना पाठवल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!