दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील लक्ष्मीनगरमधील बारवबाग येथे राहणारे अरबाज आमिर शेख (वय २४) यांना दि. १ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी आयोजित केलेल्या मंडळाच्या साऊंड वाजविण्याच्या स्पर्धेत झालेल्या वादातून सुमारे २० ते २१ जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके, लोखंडी फायटर तसेच कोयत्याने मारहाण केल्याची फिर्याद शेख यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हर्ष रोहिदास नलवडे, अमित आप्पा तांदळे, संकेत गणेश कापसे, आकाश माने, मोहेल तांदळे, संकेत अलगुडे (सर्व राहणार फलटण शहर) यांच्यासह इतर अनोळखी १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अरबाज शेख यांनी लक्ष्मीनगरमधील बारवबाग येथे त्यांच्या एकता गणेश मंडळाच्या माध्यमातून १ डिसेंबर रोजी साऊंड वाजविण्याची स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेत दोन स्पर्धकांमध्ये आवाजावरून वाद झाला होता. त्यातून पुढे झालेल्या वादात अरबाज शेख यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वरील आरोपींनी शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडके, लोखंडी फायटर तसेच कोयत्याने मारहाण केली, अशी फिर्याद अरबाज शेख यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
अरबाज शेख हे सामाजिक कार्यकर्ते आमिर शेख यांचे चिरंजीव असून आमिर शेख हे सध्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत.