तर तुम्ही ठरू शकता ऑनलाइन फ्रॉडचा पुढचा बळी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन अफरातफर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लांब कशाला अगदी आपल्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामध्ये जरी बघितलं तरी ऑनलाईन अफरातफर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून यायला लागलेली आहे. या फ्रॉड पासून वाचण्यासाठी ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना आपण काळजी घेणे आवश्यक आहे. ती नेमकी काळजी काय घ्यायची किंवा आपण ऑनलाईन व्यवहार करायचे का नाही याचा थोडक्यात आढावा आपण आज घेणार आहोत.

सध्या ऑनलाईन ट्रांजेक्शन करणाऱ्यांची संख्या अगदी आपल्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा मोठी आहे. पूर्वीच्या काळामध्ये पाकीटांमधून पैसे काढून देणाऱ्यांची संख्या मोठी होती. परंतु आता कोणीही असो फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा कोणत्याही यूपीआय ॲपवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपण जेव्हा ऑनलाईन कोणालाही पैसे पाठवत असतो; तेव्हा काही काळजी घेणे सर्वात आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, नक्की काळजी म्हणजे काय करायचं तरी काय ?

यूपीआय अँप वरून पेमेंट करताना आपण काही खबरदारी घेतली पाहिजे. आपण जर एखाद्याला त्याच्या मोबाईल नंबर वरून पैसे सेंड करत असू तर मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे नाव येते, त्या नावाची खात्री करूनच आपण पेमेंट करणे गरजेचे आहे. असे पेमेंट केल्याने खात्री होते व जर आपल्याला अजूनच खबरदारी घ्यायची असेल तर आपण एखादे पेमेंट करताना सुरुवातीला एक रुपयाच सेंड करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याला तो एक रुपया प्राप्त झाला आहे का हे बघूनच पुढील आपली रक्कम द्वारे सेंड करणे खबरदारीचे ठरते.

यानंतर आपण एखाद्या ठिकाणी जर खरेदीला गेलो तर त्या ठिकाणी त्या दुकानाच्या बिलिंग काउंटरवर आता सर्रासपणे यूपीआय पेमेंटचे क्यू आर कोड बघायला मिळतात. त्याच्यावरून आपण तातडीने पेमेंट करतो सुद्धा, परंतु असे पेमेंट करत असताना तो कोड स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी त्या दुकानाचे नाव येते का हे पाहणे गरजेचे आहे. जर एखाद्या ठिकाणी त्या दुकानाचे नाव येत नसेल तर, बिलिंग काउंटरवर ॲप मध्ये क्यू आर कोड स्कॅन करून आलेले नाव संबंधित दुकानातील व्यक्तीकडून खात्री करून घेणे गरजेचे आहे. जर तसे घेतले गेले नाही तर कोणत्यातरी दुसऱ्यालाच पैसे जातील व तुम्हाला त्याचा पूर्ण भुर्दंड पुन्हा भरावा लागेल. या मध्ये सहसा कोणी फसत नाही परंतु सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

आता ऑनलाइन खरेदी करताना जेव्हा आपण पेमेंटच्या ऑप्शनला जातो तेव्हा आपल्याला तिथे एक लिंक बघायला मिळते व त्यानंतर आपण आपले यूपीआय पेमेंटचे ॲप सिलेक्ट केल्यानंतर ती लिंक थेटपणे आपल्या ॲपवर पेमेंटच्या ऑप्शनला येऊन थांबते ऑनलाइन ट्रांजेक्शन बाबत बहुतांश ठिकाणी याच पद्धतीने पैसे लंपास केले जातात आपण यावेळी पूर्णतः खात्री करूनच पेमेंट प्रोसेस करणे गरजेचे आहे आपण ज्या ऑनलाइन खरेदी दाराकडून खरेदी केली असेल त्याचेच नाव येत आहे का ? व त्यानंतर आपण खरेदी केलेली रक्कम व आपण पेमेंट करत असलेली रक्कम या दोन्ही दिसत आहेत का ? अशा सर्व गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे.

यासोबतच बहुतांश जणांना एसएमएसद्वारे व्हाट्सअपद्वारे किंवा अन्य सोशल मीडिया साईटद्वारे तुम्हाला लॉटरी लागली आहे. या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुढील प्रोसेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या थेट यूपीआयद्वारे पैसे जमा होतील. परंतु मित्रांनो असे काहीही होत नाही. अशी कोणतीही लॉटरी कोणीही तुम्हाला घरबसल्या देऊ शकत नाही. ही तुम्हाला फसवण्याची आधुनिक पद्धत चोरट्यांना सापडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या पद्धतीला तुम्ही बळी पडू नका. कोणतीही बँक अथवा कोणतीही संस्था तुम्हाला एसएमएस व्हाट्सअप व सोशल मीडिया सेंटर द्वारे सांगत नाही की, तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुम्हाला पैसे मिळतील, असे एसएमएस आल्यास तर तातडीने तो नंबर ब्लॉक करून रिपोर्ट करण्यात यावा. त्यामुळे अन्य जणांना याचा फायदा होऊ शकतो.

ऑनलाइन व्यवहार करताना आपण जर काही ठराविक काळजी घेतली व कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर आपण योग्य त्यावेळी ब्लॉक करून रिपोर्ट केले तर आपणही ऑनलाइन फॉर्ड पासून वाचू शकतो व आपल्यासोबत इतरांना सुद्धा ऑनलाईन अफरातफर होण्यापासून वाचवण्यासाठी आपण नक्कीच मदत करू शकतो.

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक, दैनिक स्थैर्य


Back to top button
Don`t copy text!