दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । सातारा । ‘’ राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी करणे हे महाविद्यालयासमोर
एक आव्हान म्हणून पुढे असताना कौशल्य विकास हेच या शिक्षण धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे मत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशीचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. सी. डी. भोसले यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित रयत शिक्षण परिषदेत ‘रयत शिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 ची अंमलबजावणी’ या विषयावरील कार्यशाळेत ते ‘कौशल्य विकास आणि सामंजस्य करार’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर हे उपस्थित होते या व्याख्यानात बोलताना प्रा.डॉ. सी.डी भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरण पार्श्वभूमीची मांडणी केली.नवीन शैक्षणिक धोरण राबवत असताना कौशल्य विकास हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना वेगवेगळ्या सामाजिक घटकांशी एम. ओ. यु. करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थी शिक्षक सबंधबाबत बोलताना ते म्हणाले ‘’विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या विषयासंबंधीची कौशल्ये विकसित करण्यासाठी प्राध्यापकांनी वेगवेगळ्या विषयांचे स्वतः प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्राध्यापक प्रशिक्षणासंदर्भात वेगवेगळ्या कंपनीशी या अनुषंगाने एमओयू करणे महत्त्वपूर्ण ठरेल. व्यावसायिक तसेच वेगवेगळी कौशल्ये असणारे प्रशिक्षित शिक्षक ही नवीन शिक्षण धोरणाची खूप मोठी गरज आहे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जय चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.पी. व्ही. चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आसावरी शिंदे -कदम प्रा. सुवर्णा कुरकुटे आणि प्रा. यू. ए. पाटील यांनी केले. या कार्यशाळेस रयत शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राचार्य तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, उपप्राचार्य व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक बहुसंख्येने उपस्थित होते.