स्थैर्य, कोरेगाव, दि.२६: कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रहिमतपूर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सहाजणांना अटक केली. प्रकाश घाडगे, संजय कोरडे, दत्तात्रय मोरे, कृष्णात मोरे, दादासोा शिंदे, सुशांत भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३ हजार ८४० रुपयांची रोकड, पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, तारगाव परिसरातही ही कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी पाचजण युवक आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील तारगाव गावच्या हद्दीत गायरानजवळ असणाऱ्या करंजाच्या झाडाखाली काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याची सत्यता पडताळल्यानंतर येथे सापळा रचून छापा टाकला. पोलिसांनी प्रकाश मोहन घाडगे (वय ३३), संजय राजेंद्र कोरडे (वय ३०), दत्तात्रय सुरेश मोरे (वय २४), कृष्णात बळवंत मोरे (वय ४२), दादासोा वसंत शिंदे (वय ५२), सुशांत सुधाकर भोसले (वय २२) या सर्वांवर गुन्हा दाखल करुन सोमवार, दि. २४ रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली. दरम्यान, हे सर्व तारगाव येथील रहिवाशी आहेत. रहिमतपूर पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.