दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । लातूर । वयाच्या चोवीसाव्या वर्षी पुण्यातल्या एसएसपीएमच्या मैदानावर एक बुलंद भाषण ऎकलं… “रडलो पण घडलो” त्यात या भाषणाचा वाटा मोठा होता. तरुणसागर महाराजांचे व्याख्यान होते. त्याच्या सुरुवातीला एक मनोगत होतं. एक स्त्री त्या मंचावर आली… आणि पहिला शेर म्हटला…” लकीर की फ़क़ीर हूँ मै उसका कोई गम नहीं गम हुआ तो क्या हुआ दम अपना कम नहीं .” प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला. मला जाणवलं ही स्त्री म्हणजे काही तरी वेगळं रसायन आहे. माझे कान टवकारले, मी बातमीसाठी गेलो होतो. पण या भाषणाची एवढी तंद्री लागली. मी या प्रवाहात वाहत गेलो” घरी शाळेत जाऊ नये म्हणून म्हशी राखायला लावत होते, म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत जात होते, शाळेला उशीर म्हणून मास्तर मारत होते, म्हशी शेतात गेल्या म्हणून शेतकरी मारत होते. त्यातून सिंधूताई घडली.बाळांनो, होय ते सिंधुताई सपकाळ यांचे भाषण होते. त्यांच्या भाषणात जेवढ्या वेदना होत्या तेवढ्याच प्रेरणा होत्या.
“देखना एक दिन वक़्त भी तेरा गुलाम होगा ॥ मंजिले उन्ही को मिलती है. जिनके सपनो में जान होती.” त्यांच्या हा शेर तर नंतरच्या त्यांच्या जीवनाचा मुलमंत्र झाला. आणि ऐकणाऱ्या माझ्याही मनात हा खोल रुतला. तिथून माझ्या मनात प्रेरणेचे झरे वाह्यला लागले. पुढे पत्रकारीता सोडून “जनसंपर्क क्षेत्रात आलो. पुण्याच्या भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो. पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या भाषणाने आपल्याला उर्मी मिळाली. त्या सिंधुताई सपकाळ भारती विद्यापीठात आल्या. मला याची जाणीव नव्हती की डॉ. पतंगराव कदम यांनी सिंधुताईला वेळोवेळी मदत केली होती. त्याची कृतज्ञता सिंधुताई बोलून दाखवत होत्या आणि पतंगराव कदम साहेब म्हणत होते. तू खूप मोठं काम करते आहेस. आमच्या सारख्याच तुला मदत करणे हे कर्तव्य आहे. माझी भावना कर्तव्याची आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करु नको. या दोन मोठ्या मनाच्या आणि मोठ्या कर्तबगार व्यक्तींच्या पुढ्यात मी उभं राहून हे संभाषण ऐकत होतो. माझ्यासाठी दोन्ही प्रेरणा स्रोत होते. तिथे सिंधुताईची पहिली प्रत्यक्ष भेट झाली. पुढे भेटत गेलो. शासनात अधिकारी झाल्या नंतर त्यांच्या सासवड येथील ममता बाल सदनला भेट दिली. त्यावर भरभरून लिहलं. पुढे हडपसरला त्यांच्या घरी भेटायला गेलो. भरभरून बोलल्या, अख्खी जीवनी सांगितली. डोळे भरून त्यांचा निरोप घेतला. पुढे अकोल्याला जिल्हा माहिती अधिकारी असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एका सुट्टीच्या दिवशी सिंधुताईचा माहेर मध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यात मोठा सत्कार होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील त्या कार्यक्रमाला होते. मी हा कार्यक्रम मागून घेतला आणि या कार्यक्रमाला गेलो. तिथे अमरावतीचा आमचा मित्र आणि सिंधुताईच्या अगदी जवळचा मुकेश चौधरी भेटला पुढे तो अत्यंत जवळचा स्नेही झाला. त्यामुळे सिंधुताई अत्यंत जवळून बघता आल्या. त्यांचं माहेर, सासर, जिथे घडल्या आणि जिथे भोगलं. जिथे आत्महत्या करावी म्हणून गेल्या त्या चिखलदऱ्यात मला फिरता आलं. आणि त्या अधिक रुतत गेल्या आणि मनानी हे नातं अधिक घट्ट झालं. काल त्या गेल्याचे कळले आणि हा सगळा पट् डोळ्यासमोर दिसू लागला आणि डोळे तुडुंब भरले. त्याच सआश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सिंधुताई तुम्ही शेकडो अनाथाच्या मायी झालात आणि आमच्या प्रेरणेचा स्रोत.. तुमच्या कार्यानी तुम्ही अमर झाल्या आहात…पुढच्या अनेक पिढ्या तुमच्या चरित्रातून प्रेरणा घेत राहतील. तुमच्या सारखी माणसं त्या त्या शतकाची मानवी जीवनाला उभारी देण्यासाठी जन्माला आलेली देवदूतच समजतो…!!