प्रा. आ. उपकेंद्राच्या सर्व सोयींनीयुक्त इमारत बांधकामाच्या भूमीपुजनप्रसंगी ना. बाळासाहेब पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील, प्रणव ताटे, विनीता पलंगे आदी. |
स्थैर्य, मुंबई, दि. १३ : कोरोना संकटकाळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत विशेषतः या संकटामध्ये शासनाचा आरोग्य विभाग, महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, नर्सेस, आशा सेविका यांनी उत्कृष्ट काम केले असल्याचे मत नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
ते तळबीड, तालुका कराड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तात्काळ पूर्ण होणे गरजेचे असल्याने सोशल डिस्टन्सींगबाबतचे शासनाचे सर्व नियम पाळून, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनिता पलंगे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी सौ. संगीता देशमुख, डॉ. संजय कुंभार, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, त्यानंतर सर्व प्रकारचे सन, उत्सव, लग्न व सभा-समारंभ इत्यादी कार्यक‘मांवर प्रतिबंध लावण्यात आले .तद्नंतर लॉकडाऊन काहीप्रमाणात शिथील केल्यानंतर लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने संबंधित विभागाची कामे सुरू केली असून, त्या अनुषंगाने मौजे तळबीड, तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीसाठी रुपये 49.83 लक्ष मंजूर झाले आहेत. सदरची इमारत 12.55 मी. बाय 6.99 मीटर आकाराची दोन मजली आर.सी.सी इमारत, यामध्ये क्लिनिक रूम, वेटिंग रूम, एक्झामीन रूम, लेबर रूम, लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, टॉयलेट आदी.सोयी सुविधा असून अत्यंत सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे.
सदर इमारतीचे काम हे वेळेत व उत्कृष्ट दर्जाचे व्हावे या संबंधीच्या सूचना संबंधित अधिकार्यांना नामदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कांग‘ेस पार्टीचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सुत्रसंचालन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते यांनी केले, प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांनी केले व आभार जयवंत मानकर यांनी मानले.
कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.