प्रा. आ. उपकेंद्राच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ना. बाळासाहेब पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, प्रणव ताटे, विनीता पलंगे. |
स्थैर्य, कराड, दि. 14 : कोरोना संकटकाळात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः या संकटामध्ये शासनाचा आरोग्य विभाग, महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, नर्सेस, आशा सेविका यांनी उत्कृष्ट काम केले असल्याचे मत ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
तळबीड, ता. कराड येथे त्यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तत्काळ पूर्ण होणे गरजेचे असल्याने सोशल डिस्टन्िंसगबाबतचे शासनाचे सर्व नियम पाळून, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनीता पलंगे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी सौ. संगीता देशमुख, डॉ.संजय कुंभार, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील यांची उपस्थिती होती.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीसाठी रुपये 49.83 लक्ष मंजूर झाले आहेत. सदरची इमारत 12.55 मी. बाय 6.99 मीटर आकाराची दोन मजली आर.सी.सी इमारत, यामध्ये क्लिनिक रूम, वेटिंग रूम, एक्झामीन रूम, लेबर रूम, लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, टॉयलेट आदी सोयीसुविधा असून सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे. याप्रसंगी मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, प्रणव ताटे यांनी मार्गदर्शन केले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच जयवंतराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. जयवंत मानकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.