प्रभाग ८ मध्ये सिद्धाली शहा यांच्या संपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ आणि महिलांचा मोठा सहभाग


स्थैर्य, फलटण, दि. 10 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप (खासदार गट) कडून इच्छुक असलेल्या सिद्धाली अनुप शहा यांनी जोरदार जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. रविवारी त्यांनी ब्राह्मण गल्ली परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले, तर महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सिद्धाली शहा यांनी ब्राह्मण गल्लीतील घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील मूलभूत सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी चर्चा केली.

या भेटीगाठीदरम्यान सिद्धाली शहा यांनी लहान मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना खेळणी दिली, ज्यामुळे वातावरणात अधिकच उत्साह निर्माण झाला. कुटुंबीयांनीही त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे या संपर्क मोहिमेला विशेष रंगत आली होती.

यावेळी बोलताना सिद्धाली शहा म्हणाल्या की, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांच्या एका हाकेला धावून जाऊन त्यांची कामे करणे, हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे जीवन धन्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या या संपर्क मोहिमेला मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सिद्धाली शहा यांच्या या सक्रिय प्रचारामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


Back to top button
Don`t copy text!