अवैध प्रकार चालणार्‍या पालिकेच्या जागा शटर लावून बंद करा; खा. रणजितसिंह यांच्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहर व तालुक्यात अनेक गुंडगिरी करणारे आले आणि गेले, नुकताच व्यापार्‍यांवर कोयता हल्ला झाला, तो भयावह असून अशा लोकांचा पोलिसांनी बंदोबस्त केला असून त्यांच्यावर कायदेशीर व कडक कारवाई होईलच, पण यापुढे कोणी व्यापारी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, त्यांना त्रास दिल्यास त्यांची गय केली जाणार नाही. तसेच पालिकेच्या जागेत हे लोक दारू पिणे, गांजा ओढणे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुख्याधिकारी यांना या जागा शटर लावून बंद करा, अशा सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, नुकताच फलटण येथील व्यापार्‍यांवर दोन माथेफिरूंनी कोयता हल्ला करून पैसे लुटले होते, मात्र लगेच पोलिसांनी त्या दोन माथेफिरूंना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते. त्याअनुषंगाने व्यापार्‍यांना धीर देण्यासाठी आज खा. रणजितसिंह यांनी संबंधित व्यापारी व बाजारपेठेत भेट देऊन त्या पीडित कुटुंबांची भेट घेतली व पोलीस व इतर अधिकार्‍यांना अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अशोकराव जाधव, जाकीरभाई मनेर, वसीम मनेर, राजेंद्र हेंद्रे तसेच इतर पदाधिकारी तसेच व्यापारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना व्यापार्‍यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितले की, सुपर मार्केटमध्ये हे माथेफिरू दारू पिणे, गांजा ओढणे तसेच शिवीगाळ करणे, असे प्रकार करीत असून हे लोक दहशत निर्माण करत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुख्य बाजारपेठेत अनेक व्यापार्‍यांना काही लोक हकनाक त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे, रात्रीच्या वेळी बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी केली.

यावेळी लगेचच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या व यापुढे व्यापार्‍यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे, असे सांगून पीडित कुटुंबाला मानसिक आधार देत ‘मी तुमच्याबरोबर आहे’ असे म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!