दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित धुळगुडे, सहायक प्राध्यापक, भूगोल विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण उपस्थित होते.
यावेळी डॉ. अभिजित धुळगुडे यांनी विद्यार्थी जीवनातील पुस्तकाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये वाचन गुण आत्मसात करण्यासाठी छोटी छोटी पुस्तके वाचणे अत्यंत गरजेचे आहे, पुस्तक हे आपले खरे मित्र असतात, वाचनाने ज्ञानात भर पडते, अशी अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्याअनुषंगाने लेखक-भेटी, मुलाखती, वाङ्मयीन कार्यक्रम यांचं सातत्यानं आयोजन करायला हवं, असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी आजच्या आधुनिक युगात विद्यार्थी मोबाईलच्या अतिवापरामुळे, व्यासंगामुळे वाचन संस्कृतीपासून लांब जात आहेत. विद्यार्थ्यांनी दररोज महाविद्यालयामध्ये असताना एकदा तरी ग्रंथालयाला भेट द्यावी, असे आवाहन करीत वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रं यांविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे वाचन-संस्कृती होय. वाचन व्यक्तिगत पातळीवरून गटपातळीवर, गटपातळीवरून समाजपातळीवर, समाजपातळीवरून सांस्कृतिक परंपरेत सामील होत असेल, तर त्याला वाचन-संस्कृती म्हणता येईल, असे सांगितले.
या कार्यक्रमाला श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रकाश तरटे, कृषी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष रुपटके, ग्रंथपाल सहायक श्री. प्रीतम भगत, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सायली निंबाळकर व सायली कर्चे आणि आभार तृप्ती घाटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाने विशेष परिश्रम घेतले.