दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागले आहेत. यामध्ये आगामी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांशी आज संवाद साधणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर गत ३० वर्षे एकहाती सत्ता असलेले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची खाजगी बैठक आयोजित केली आहे. आज उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे श्रीमंत रामराजे यांच्याशी संवाद साधणार आहेत. ते झाल्यानंतर राजे गटाची बैठक आयोजित केली असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यासोबतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दुपारी १२ वाजता कार्यकर्त्यांचा जाहीर मेळाव्याचे आयोजन केले आहे. नक्की माजी खासदार रणजितसिंह कोणती भूमिका जाहीर करणार ? याकडे सुद्धा मतदारसंघासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
काल इंदापूर येथे झालेल्या सभेमध्ये शरदचंद्र पवार यांनी आज इंदापूर येथे होत असलेला कार्यक्रमच दि. १४ ऑक्टोबर रोजी फलटण येथे आहे अश्या आशयाचे विधान केल्याने श्रीमंत रामराजे हे अजित पवारांना राम राम ठोकत पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा मुहूर्तच शरद पवार यांनी जाहीर केला आहे कि काय ? नक्की शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा अर्थ काय ? यावर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.