दैनिक स्थैर्य | दि. 29 जानेवारी 2025 | फलटण | फलटण तालुक्याच्या राजकारणात अलीकडे एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रत्येक मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांची बैठक बोलवण्यात येते. या बैठकीमध्ये पार्टीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होते आणि पार्टी नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. काल झालेल्या बैठकीमध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासोबतच एकीकडे बैठक होत असताना बैठकीच्या पूर्वी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेते मंडळींची सदिच्छा भेट घेतली आहे.
श्रीमंत रामराजे यांची बैठकीत उपस्थिती यासोबतच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवरूपराजे खर्डेकर यांच्या या भेटीमुळे अनेक राजकीय प्रश्न तयार होत आहेत. ही भेट केवळ एक औपचारिक भेट होती की त्यामागे काही राजकीय हेतू होते, याबद्दल विविध मनोरे बांधले जात आहेत.
शिवरूपराजे खर्डेकर यांच्या भूमिकेचे देखील विशेष महत्त्व आहे. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांचा प्रभाव नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसला आहे. दोन्ही भेटींमुळे दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषक मानत आहेत.
या भेटीने फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, ही भेट राजकीय समीकरणे बदलण्याची एक चाल असू शकते, तर काहींच्या मते ही भेट केवळ एक औपचारिक भेट होती. मात्र, या भेटीचे परिणाम पुढील काळात दिसून येतील, हे निश्चित आहे.