
दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे श्रीमंत निर्मलादेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, श्रीमंत निर्मलादेवी राणीसाहेब या फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत.मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांच्या ज्येष्ठ स्नुषा तर श्रीमंत प्रतापसिंह नाईक निंबाळकर महाराज यांच्या सुविद्य पत्नी व ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा स्वभाव सोज्वळ व सालस होता. त्या उत्तम प्रकारे लेखन करीत असतं. त्यांनी गद्यलेखन करताना ‘परीकथेतील शुभा’ हे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ताईसाहेब यांच्या बालपणातील जीवनावर सकस असे पुस्तक लिहिले. ज्याचा मराठी बालसाहित्यामध्ये उल्लेख केला पाहिजे. त्यांचे काव्यलेखनही उल्लेखनीय होते. त्यांनी लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी विविध प्रकारचे फुलझाडे, फळझाडे व मानवपयोगी वनस्पतींची झाडे लावली व तहहयात जोपासली. त्यांचा निर्मळ, निगर्वी स्वभाव फलटणसाठी आपलेपणाचा व माणुसकीचा होता. अशा थोर श्रीमंत निर्मलादेवी राणीसाहेबांना मुधोजी कॉलेजच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन करतो.
प्रास्ताविक डॉ. संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.