श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराला एक वेगळीच प्रतिष्ठा व मान, सन्मान – उदय माहूरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ मे २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी फलटण संस्थानचे घरोब्याचे संबंध आहेत, हे सर्वांना माहीत आहे; परंतु या घराण्याने त्यांचा विचार पुढे नेला आहे. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे दूरदर्शी आहे. मला मिळालेला पुरस्कार हा श्रीमंत मालोजीराजे यांच्या नावाने असल्याने त्याला एक वेगळीच प्रतिष्ठा व मान, सन्मान असल्याचे प्रतिपादन केंद्रिय माहिती आयोग, दिल्लीचे आयुक्त उदय माहूरकर यांनी केले.

यंदाचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व आयुक्त केंद्रिय माहिती आयोग, दिल्ली उदय माहूरकर यांना जाहीर झाला असून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटण येथे हा पुरस्कार माहूरकर प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेशाम चांडक होते. यावेळी व्यासपीठावर आ. दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्राचार्य विश्वासराव देशमुख, महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हेमंत माहूरकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

आजवर जे महापुरूष होवून गेले त्यांचं खरं स्थान काय? याची जाणीव समाजाला असायला हवी, असे निदर्शनास आणून देत माहूरकर म्हणाले की, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना राज्याच्या सहकाराचे प्रणेते म्हटले जाते; परंतु त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास केला तर माझ्या दृष्टीने ते देशाच्या सहकार क्षेत्राचे प्रणेते होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जेव्हा संस्थाने भारतात विलीन झाली, तेव्हा मालोजीराजे हे एका राजाचे सर्वसामान्य नागरिक झाले; परंतु एवढा मोठा बदल त्यांनी सहजपणे स्वीकारला. या त्यांच्या मोठेपणामुळे आपण प्रभावित झाल्याचे स्पष्ट करून माहूरकर म्हणाले की, छ. शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याची लांबी त्यांच्या मृत्यूसमयी सोळाशे किलोमीटर एवढी लांब होती. दक्षिण गुजरातमधील वलसाड ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील जिंजीच्या पुढेपर्यंत त्यांच्या राज्याचा विस्तार होता. त्यामुळे छ. शिवाजी महाराज हे आपल्या दृष्टीने ‘राजे’ नसून ते ‘सम्राट’ होते. महाराजांचा इतिहास गौरवपूर्ण असून आपण त्यापासून प्रेरणा घ्यायला हवी.

श्रीमंत मालोजीराजे यांनी सर्वसामान्य माणसाला प्रमाण मानून दूरदृष्टीने त्यांनी त्यांचं राज्य चालविले. तीच दूरदृष्टी आम्ही सर्वजण ठेवत आलो आहोत व ठेवणार आहोत, असे स्पष्ट करून रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, मालोजीराजे यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं.त्यागातून समाजाची सेवा घडावी, याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली. त्यांच्या माध्यमातून येथे नीरा-उजवा कालवा आल्याने या भागात जलक्रांती झाली. एक नवीन विचार सुरू झाला, कारखाने आले, शेतकर्‍याला वैभव आले. नवीन पिढीला फलटणचा इतिहास, झालेली धरणांची कामे, जलक्रांती याची माहिती असायला हवी यानिमित्ताने व श्रीमंत मालोजीराजे यांच्या स्मृती जागविण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, असे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. आभार डॉ. प्रभाकर पवार यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!