दैनिक स्थैर्य | दि. १६ मे २०२३ | फलटण |
कामगार व शेतकर्यांना वेळच्यावेळी दिलेली ऊस बिले व पगार यामुळे श्री दत्त इंडिया कंपनीची विश्वासार्हता वाढून कंपनीने साखर व्यवसायात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री दत्त इंडिया कंपनीमुळे फलटण तालुक्याबरोबरच साखरवाडी परिसराला ऊर्जितावस्था आली असून श्री दत्त इंडियाने कामगारांचा व शेतकर्यांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी व कामगारांचे हित पाहून चार वर्षांपूर्वी मी केलेल्या मध्यस्थीला यश आल्याने समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत श्री दत्त इंडिया कंपनीच्या कर्मचार्यांना संबोधित करताना श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी श्री दत्त इंडिया साखर कारखान्यातील कामगार बहूसंख्येने उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, पूर्वाश्रमीच्या ‘न्यू फलटण शुगर काळातील कामगारांच्या जुन्या थकीत देण्यांपैकी भविष्य निर्वाह निधी हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने तो सोडून इतर थकीत पगार व ग्रॅज्युटीची रक्कम श्री दत्त इंडिया कंपनीने कामगारांना दिली आहे. फलटण तालुका साखर कामगार युनियन व कंपनी प्रशासनामध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकांमधील निर्णयानुसार श्री दत्त इंडिया कंपनी प्रशासनाने पूर्वाश्रमीच्या न्यू फलटण शुगर काळातील जुन्या थकीत पगारापैकी कंपनी साखरवाडीत आल्यानंतर आजअखेर एकूण पाच पगार कायम, हंगामी व तात्पुरत्या कामगारांना दिले आहेत. २००५ सालापासून निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅज्युटीची रक्कम सुद्धा कंपनीने दिली आहे.
नोव्हेंबर २०१९ साली श्री दत्त इंडियाने बंद पडलेला कारखाना विकत घेतला. त्यावेळी कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रीक टन इतकी होती. आज दैनंदिन ७ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता, २७ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प, २५० केएलपीडी क्षमतेची अत्याधुनिक डिस्टीलरीची उभारणी, त्याचबरोबर साखर बारदाणांची (पीपी बॅग) बनवणारी कंपनी यासारख्या उद्योगाची श्री दत्त इंडिया कंपनीने साखरवाडीत उभारणी केली आहे. त्यामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नुकताच कारखान्याने आपला चौथा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
श्रीमंत रामराजे म्हणाले की, श्री दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू व प्रीती रूपरेल यांनी मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यांनी बंद पडलेल्या कारखाना विकत घ्यायचा निर्णय घेऊन कारखाना सुरू केल्याने इतर तालुक्यात प्रत्येक हंगामात अतिरिक्त उसाचा जो प्रश्न निर्माण होतो तो या भागातील शेतकर्यांना भेडसावला नाही. तसेच दत्त इंडियाने फक्त साखर उत्पादनावर अवलंबून न राहता उसापासून बनवले जाणारे इतर उपपदार्थ या उत्पादनांवर भर दिल्याने या ठिकाणी भविष्यात हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, यात कोणतीच शंका नसल्याचे श्रीमंत रामराजे यांनी म्हटले आहे.