दैनिक स्थैर्य | दि. ५ जून २०२३ | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा हा पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गस्थ होत असतो. यासाठीच पालखी सोहळ्यातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच नीरा स्नान, लोणंद, तरडगाव, फलटण व इतर पालखी तळांची पाहणी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली. आषाढी वारीच्या काळामध्ये वारकर्यांना पोलीस दलाचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे, असे मत यावेळी फुलारी यांनी व्यक्त केले.
फलटण येथील पालखी तळाची पाहणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना फुलारी म्हणाले कि, श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी संपर्कासाठी पोलीस दलातील विविध नंबर हे उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून वारकऱ्यांच्या बाबतीत कोणतीही घटना घडली तरी सुद्धा त्या ठिकाणी तातडीने पोलीस प्रशासन दाखल होईल. यासोबतच पालखी काळामध्ये भुरट्या चोऱ्या थांबण्यासाठी काही विशेष पथके तैनाद करण्यात येणार आहेत.