
फलटण येथील ऐतिहासिक नाईक निंबाळकर राजघराण्याचे व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजाळे (ता. फलटण) येथील श्री जानाई मातेचा (जानुबाई) वार्षिक यात्रा उत्सव दि. ९ आणि १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 7 एप्रिल : फलटण येथील ऐतिहासिक नाईक निंबाळकर राजघराण्याचे तसेच महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजाळे (ता. फलटण) येथील श्री जानाई मातेचा (जानुबाई) वार्षिक यात्रा उत्सव दि. ९ आणि १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेनिमित्त गावात जय्यत तयारी सुरू असून, विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री जानाई माता ही ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून सर्वदूर परिचित आहे. त्यामुळे नवरात्र आणि श्रावण महिन्यासह यात्रेच्या काळात हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी करतात. स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या या मुख्य मंदिरात परंपरेने सेवाकरी नित्यनेमाने देवीची सेवा व आरती करतात. चैत्र महिन्यातील सप्तमी व अष्टमीला होणाऱ्या या यात्रेचे स्वरूप अत्यंत भव्य असते.
यात्रेतील कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे:
गुरुवार, दि. ९ एप्रिल:
-
दुपारी २:०० वाजता: देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे व ग्रामस्थांमार्फत साडी-चोळी अर्पण करणे.
-
सायंकाळी ७:०० वाजता: मानाच्या काठ्या गोळा करणे.
-
रात्री ८:०० वाजता: हळदीचा कार्यक्रम.
-
रात्री ९ ते ११: मनोरंजनासाठी ‘मन मदन मंजिरी’ यांचा शानदार ऑर्केस्ट्रा कार्यक्रम.
शुक्रवार, दि. १० एप्रिल (मुख्य यात्रा दिवस):
-
पहाटे ३:३० वाजता: वाजत-गाजत देवीचा छबिना व पालखी सोहळा सुरू होईल. (गावात पालखी आल्यानंतर देवीला पाटील वाड्यात स्नान घातले जाते. ग्राम प्रदक्षिणेनंतर सूर्योदयाअगोदर पालखी पुन्हा मंदिरात पोहोचेल आणि भैरोबा मंदिरात छबिण्याची सांगता होईल.)
-
सकाळी १० ते सायं ४: भाविकांच्या मनोरंजनासाठी ‘भिका भीमा तमाशा मंडळा’चा कार्यक्रम.
-
सायंकाळी ४:०० वाजता: कुस्त्यांचे जंगी मैदान सुरू होईल. कुस्त्या संपल्यानंतर यात्रेची विधिवत सांगता होईल.
मानाचा छबिना आणि ऐतिहासिक वारसा:
येथील देवीचा मुख्य मान परंपरेने निंबाळकर-पाटील घराण्याकडे आहे. यात्रा काळात देवीला पुरातन काळातील मौल्यवान दागिने चढवले जातात. पहाटे निघणाऱ्या छबिण्यात अनेक मानाच्या शासनकाठ्या सहभागी होतात. गुलाल उधळून आणि फटाक्यांची मोठी आतषबाजी करून ठीकठिकाणी पालखीचे जंगी स्वागत केले जाते. नवसपूर्तीसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
भाविकांनी या ऐतिहासिक आणि भक्तिमय यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट, व्यवस्थापक, यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ राजाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(सदर माहिती राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री. निळकंठ निंबाळकर सर यांनी संकलित केली आहे.)
