फलटण येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने श्रीदुर्गामातादौड संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने श्रीदुर्गामातादौडचे आयोजन करण्यात आले होते. या दुर्गामाता दौडीत शेकडोजणांनी सहभाग घेतला होता. घटस्थापना ते दसरा अशी गुरुवार दि. ३ ऑक्टोबर ते शनिवार, दि. १२ ऑक्टोबरदरम्यान ही श्री दुर्गामाता दौड संपन्न झाली.

हजारो वर्षांपासून संपूर्ण हिंदुस्थानभर घरोघरी नवरात्र बसते. रोज सकाळ, संध्याकाळ पूजापाठ, नैवेद्य, आरती करणे हा धर्माचार सर्वचजण पाळत असतात. पोराबाळांचा संसार सुखाचा, समाधानाचा व्हावा यासाठी श्रीदुर्गामातेचा आशिर्वाद मागण्याची पद्धती आपण सर्वचजण प्रतिवर्ष पाळत आहोत. पुण्यश्लोक श्रीजिजामातांनीही प्रतिवर्ष त्यांच्या संसारात नवरात्र बसवले असेल. पण त्यांनी, श्री तुळजाभवानीचे जवळ स्वतःच्या संसारासाठी नव्हे वा भोसले वंशासाठी नव्हे; तर आसेतु हिमाचल औरस चौरस पसरलेला भारतमातेचा उद्ध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आशिर्वाद मागितले असतील. भोसल्यांच्या घरांतील नवरात्र हे त्यांच्या घरासाठी, वंशासाठी, कुटुंबासाठी नव्हते तर सार्‍या हिंदुसमाजाच्या संसारासाठी होते.

श्री शिवछत्रपतींच्या उण्यापुर्‍या ५० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी देश, देव, धर्म यांच्यासाठी मुसलमान सत्ताधिशांशी शेकडो रणसंग्राम केले. क्षणाचाही विसावा न घेता, केवळ हिंदू धर्माच्या व हिंदू समाजासाठी श्री शिवछत्रपती अखंड दौडले, लढले, झगडले. त्यांच्या रक्तांतील ती देश, देव, धर्माविषयीची पोटतिडीक, कळवळा त्यांच्या दौडण्यातून व झगडण्यातून दिसून येतो. तीच वृत्ती आजच्या तरुणपिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नवरात्रांत प्रत्येक दिवशी पहाटे शेकडो-हजारो तरुणांनी भगवा झेंडा घेऊन श्री दुर्गामातेचा, भारतमातेचा व वीरपुरुषांचा जयजयकार करीत, जगदंबेच्या पायाशी दौडत श्रीशिवछत्रपतींच्यासारखी देशभक्तीची व धर्मभक्तीची आग दे, रग दे, धग दे असे मागावयास जाण्याचा कार्यक्रम म्हणजेच ‘श्रीदुर्गामातादौड’ होय.


Back to top button
Don`t copy text!